बीड - परजिल्ह्यातून ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यात येत असल्याचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने सोमवारी बीड जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे सांगितले होते. मात्र, मंगळवारी पहाटे बीड जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला व यामध्ये काही बाबींना लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्याचे सांगितले आहे. यामध्ये चित्रपटगृह, जलतरण तलाव तसेच वाहतूक करण्यावर निर्बंध आहेत. मात्र, शेती क्षेत्राशी निगडीत सर्व कामे सुरू राहणार आहेत. याशिवाय बांधकामदेखील नियमांचे पालन करत सुरू ठेवता येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही उद्योगांना सुरू करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर देखील जिल्ह्यात सोमवारी लॉकडाऊन जैसेथे होते. परजिल्ह्यातून ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात येत आहेत. यातच येथील काही उद्योगांना सुरू केले तर मोठी गर्दी होईल, असे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम ठेवले होते. मात्र, मंगळवारी पहाटे एक वाजता बीड जिल्हाधिकारी यांनी नवा आदेश काढला व अत्यावश्यक उद्योगांना सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली.
बीड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांमध्ये कृषी मालवाहतूक, आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प त्यावर चालणारे घाऊक तसेच किरकोळ दुकानाला परवानगी दिली आहे. मात्र, हे चालू ठेवण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हे राहणार बंद -
सार्वजनिक वाहतुकीकरिता होणारी बस वाहतूक तसेच रिक्षा, चित्रपटगृह, मॉल, खरेदी संकुले, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृहे बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या नव्या देशांमध्ये म्हटले आहे.