बीड - वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव कार पुलाच्या खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून पुण्याकडे जात असताना कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर गेवराई तालुक्यातील माथूरी शिवारात घडला. विलास रामचंद्र तागलपल्लेवार (वय-55, रा. पुसद, जि. यवतमाळ), ममता विलास तागलपल्लेवार (वय 50 रा. पुसद जि. यवतमाळ) असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
वाहनावरील ताबा सुटला अनं...
विलास तगलपल्लेवार व त्यांच्या पत्नी ममता या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून पुण्याकडे चालले होते. स्वतः विलास हे कार चालवत होते. पुण्याला त्यांची दोन मुले शिक्षणासाठी ठेवलेली आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोघे पती-पत्नी पुण्याला जात होते. दरम्यान, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर गेवराई तालुक्यातील माथूरी येथे आल्यानंतर विलास यांचा कारवरील ताबा सुटला. कार भरधाव असल्याने मार्गावरील पुलाच्या खाली कोसळली.
या अपघातात विलास यांचा जागीच मृत्यू झाला. तर ममता यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
हेही वाचा - रुग्ण वाढ सुरुच; बुधवारी राज्यात 8807 नवीन कोरोनाबाधित, 80 मृत्यू