बीड - धुळे-सोलापूर महामार्गावर बुधवारी पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला पाठिमागून एका टिप्परने धडक दिली. यामध्ये टेम्पोतील भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात हायवे पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याने संतप्त भाविकांनी चक्क धुळे-सोलापूर महामार्गावर चौसाळा नजीक दोन तास रास्ता रोकोकेला. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन भाविकांना रस्त्याच्या बाजूला बसवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जखमी भाविकांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. तर सुरेश पवार, विक्की जाधव, उत्तम अरगडे अशी तीन गंभीर जखमी भाविकांची नावे आहेत. भाविकांचा टेम्पोत ४० प्रवासी होते. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा संपवून भाविक टेम्पोने जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगावकडे चालले होते. दरम्यान, चौसाळाजवळ हायवे पोलिसांनी भाविकांचा टेम्पो अडवला. टेम्पो धुळे-सोलापूर महामार्गावर असल्याने टेम्पोची गती अधिक होती. टेम्पो चालक हळूहळू टेम्पो उभा करत असतानाच हायवे पोलिसांनी काचेवर हातातील काठी जोरात मारली. यामुळे चालकाने ब्रेक दाबले. टेम्पोच्या पाठीमागून वेगवान टिप्पर येत होते. आयआरबीचे टिप्पर भाविकांच्या टेम्पोला पाठिमागून जोराचे धडकले.
पोलिसांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा करताच चालक वाहन थांबवत असताना देखील हायवे पोलिसांनी काचेवर काठी मारली. म्हणून संतप्त भाविकांनी धुळे-सोलापूर महामार्गावरच ठिय्या मारत रास्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन तब्बल दोन तास चालले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.
अपघातानंतर हायवे वाहतूक पोलिसांनी जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात देखील घेऊन जाण्याचे औदार्य दाखवले नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन भाविकांना रस्त्याच्या बाजूला थांबवून बोलण्याबाबत विनंती करत वाहतूक सुरळीत केली.
स्थानिक नागरिकांमध्येही हायवे पोलिसांबाबत रोष
धुळे-सोलापूर महामार्गावर पहाटे सहापासूनच हायवे पोलीस गाड्या अडवून जड वाहनांची तसेच इतर गाड्यांची तपासणी करतात. धुळे-सोलापूर हा महामार्ग चौपदरीकरण झाल्यामुळे वाहनांची रहदारी वाढली आहे. वाहने अधिक गतीने धावत असतात. यातच हायवे पोलीस मध्येच वाहने आडवतात. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारे वाहने आढळून येत, असे स्थानिक नागरिकांनी देखील यावेळी बोलताना सांगितले. स्थानिक नागरिकांमध्ये देखील हायवे पोलिसांच्या कामाबाबत नकारात्मक भावना असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.