औरंगाबाद - पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या वाहनाच्या लोकेशनवर वाळू तस्कराकंडून पाळत ठेवली जात होती. त्यानंतर अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. यावेळी स्कॉर्पिओ व एक हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : हरीसिद्धी देवीच्या जत्रेला उत्साहात सुरुवात
उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन व गोदा पात्रातील वाळू तस्करीवर पाळत ठेवण्यासाठी पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सोमवारी रात्री पाचोड पोलीस स्टेशन हद्दीतून जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनामागे दोन स्कार्पिओ पुढेमागे पाठलाग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ते मुरमा फाट्यावर थांबले असता, त्यांना शहागडकडून औरंगाबादकडे अवैधरित्या ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक निदर्शनास आला. त्याला थांबून चालकाची चौकशी केली असता, अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस उपाधीक्षक यांच्या वाहनाचे लोकेशन टॅप करणाऱ्या 2 स्कॉर्पिओंपैकी एक स्कॉर्पिओ अंधाराचा फायदा घेत फरार झाली. तर, एक ताब्यात घेतली आहे. एक हायवा ट्रक व स्कार्पिओ असा एकूण 27 लाखांचा मुद्देमालांसह सुभाष राठोड (रा. संजय नगर औरंगाबाद), केशव वायभट (रा. अंकुश नगर ता. अंबड जालना) या दोन वाहन चालकांविरुद्ध पाचोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.