औरंगाबाद - कन्नड-चाळीसगाव घाटात साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र, तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
चाळीसगावहून कन्नडकडे जात असताना या ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटले आणि ट्रकने पेट घेतला. स्थानिकांनी तत्काळ घटनेची माहिती नगरपरिषेदेचे सभागृह गटनेते संतोष कोल्हे यांना दिली. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार
या घटनेमुळे कन्नड-चाळीसगाव घाटात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. नगरपरिषदेचे रमेश थोरात आणि चाळीसगाव पोलीस यांच्या प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले.