औरंगाबाद - विद्यार्थ्यांना निसर्गाशी एकरूप होता यावे यासाठी औरंगाबादच्या क्रिएटिव्ह इंग्रजी शाळेने अनोखा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी तब्बल पाच हजार सिडबॉल तयार करुन साई टेकडीवर वृक्षारोपन केले. यासाठी त्यांनी अग्निहोत्र रक्षा, गोमूत्र, गाईचे शेणखत, माती व विविध दहा ते पंधरा प्रजातींच्या झाडांच्या बियांचा वापर केला.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी यंदा शासनाने 33 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यात अनेकजण आपआपल्यापरीने सहभाग घेत आहेत. या मोहिमेत आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने निपाणी येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण, वृक्षसंवर्धन, निसर्गाचे महत्व पटवून देण्यासाठी वृक्षसंवर्धन का महत्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
झाडांमुळे पाऊस कसा पडतो? पर्यावरण संतुलनासाठी झाडे कशी महत्त्वाची असतात, याविषयी सखोल माहिती देण्यात आली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसात माती, शेणखत, अग्निहोत्र रक्षा यांच्यासह करंज, फणस, पिंपळ, सप्तपर्णी, कडूनिंब, आंबा, चिंच, जांभूळ अशा विविध वृक्षांच्या बियांपासून सिडबॉल तयार केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा परिसर, सातारा परिसरातील साई टेकडीवर सुमारे पाच हजार सिडबॉलचे रोपण केले. यावेळी वनीकरण विभागाचे सतीश वडसकर, वाय. एल. केसरकर, संस्थेचे अध्यक्ष एस. पी. जवळकर, संकल्प फाऊंडेशनच्या विशाखा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.