औरंगाबाद - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा सुरू करण्याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यामध्ये 15 जुलै पासून ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीला विद्यार्थींची उपस्थिती 29 टक्के होती. मात्र, महिना अखेर ही उपस्थिती 44 टक्क्यांवर गेली असून पालक आणि विद्यार्थी शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली.
'ग्रामीण भागात 605 शाळा झाल्या सुरू'
शासन निर्णयानुसार 15 जुलैपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. ज्या गावामध्ये 30 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, अशा गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पाहिल्या दिवशी 488 शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. हळूहळू ज्या गावांमध्ये रुग्ण नाहीत त्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या, ग्रामीण भागामध्ये शाळेची संख्या वाढली असून, 30 जुलै पर्यंत 605 शाळा सुरू झाल्या आहेत. अशी, माहितीही शिक्षण अधिकारी चव्हाण यांनी दिली.
'रुग्ण आढळून आल्याने 30 शाळा बंद'
ग्रामीण भागात शाळा सुरू करत असताना ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना रुग्ण आढळून आला तर, शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये 30 शाळा बंद करण्यात आल्या. या ठिकाणी कोरोना रुग्ण बरे झाल्यावर महिनाभरात पुन्हा शाळा सुरू केल्या जातील अशी माहिती शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली.
'बंद झालेल्या शाळांमध्ये'
औरंगाबाद तालुका - 92 पैकी 1, कन्नड - 72 पैकी 2, गंगापूर - 84 पैकी 7, पैठण - 61 पैकी 5, फुलंब्री - 58 पैकी 1, वैजापूर - 51 पैकी 12, सिल्लोड - 120 पैकी 2 शाळा बंद करण्यात आल्या असून, या भागातील गाव कोरोना मुक्त होताच शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
'पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी'
ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आल्या असल्या, तरी शहरी भागात अद्याप शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. शहरासह ग्रामीण भागातील पालकांनी पूर्ण शाळा सुरू करा, अशी मागणी केली आहे. मात्र, शासन निर्णयानुसार अद्याप शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नसला, तरी शिक्षण समितीने ठराव घेऊन शासनाला प्रस्ताव पाठवून पाचवीच्या वरील वर्ग सुरू करावे, असा प्रस्ताव असल्याची माहिती शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी दिली.