गंगापूर : मित्रानेच मित्राचा लाकडी दांड्याके डोक्यात मारून घात केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. गंगापूर शहरातील समतानगर येथे 17 मार्च शुक्रवार रोजी मित्रानेच लाकडी दांड्याने डोक्याला मारहाण करून दुसऱ्या मित्राला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. यातील आरोपी नवनाथ खैरे रा.गंगापूर यास गंगापूर पोलिसांनी नासिक जिल्ह्यातील निफाड येथून ताब्यात घेतले.
मारहाणीत जखमी झालेला योगेश शंकरराव भालेकर (३९) रा.समतानगर यांचा उपचारा दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. योगेश हे घटनेच्या दिवशी रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. शुक्रवारी रात्री ते आपला मित्र आरोपी नवनाथ खैरे याच्यासह घरी आले होते त्यांच्या दोघांत साडे आठ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरुन वाद झाला. नवनाथ याने योगेश यांच्या डोक्यात लाकडी दांडा मारून त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
डोक्याला जबर मार लागल्याने योगेश यांचा मोठा रक्तस्त्राव झाला. जखमी योगेश रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दहाच्या सुमारास डब्बा घेऊन गेलेल्या त्यांच्या आईला ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्या नंतर त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देऊन रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ याच्या मदतीने जखमी योगेश यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रात्रभर रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृर्ती जास्त बिघडली होती. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा डोक्याला जबर इजा झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने योगेश यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. दरम्यान उपचार घेत असतानाच सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश भालेकर याचा भाऊ सचिन यांनी गंगापूर पोलिसात रविवारी दुपारी नवनाथ खैरे विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्याने आरोपी विरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अशोक चौरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बलविर बहुरे,पदमकुमार जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी नवनाथ खैरे यास निफाड येथून ताब्यात घेतले व अटक केली; प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक चौरे हे करत आहेत.