औरंगाबाद - लोकसभा निवडणूक मतदान पार पडताच शहरात नेत्यांचे सोशल मीडिया वॉर पेटल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करणे आमदार हर्षवर्धन जाधव यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर क्रांतीचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएम आमदार इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यातील शाब्दिक चकमकीने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर एमआयएमच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह विधान असणारा व्हिडिओ टाकला. या कृत्यामुळे शहरातील सामाजिक वातावरण दूषित झाले. या व्हिडिओला प्रत्युत्तर म्हणून आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विखारी प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकली. या विधानात ५ मिनिटे द्या एमआयएम पक्ष नष्ट करू, असे विधान केले.
या विधानानंतर हर्षवर्धन जाधव यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. आणखी एका व्हिडिओनुसार हर्षवर्धन जाधव यांनी युवकांना २७ एप्रिलच्या रात्री एकत्र येऊन एमआयएम कार्यालय उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, एमआयएम आमदार आणि लोकसभा उमेदवार इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओचा पक्षाशी संबंध नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर केला. त्यांनतर वादावर पडदा पडला आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्याकडून आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून एमआयएमला इशारा देण्यात आला. रात्री उशिरा हर्षवर्धन जाधव यांच्यावर क्रांतीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून केलेल्या वक्तव्याची तपासणी करणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.