औरंगाबाद - चंदनाच्या झाडांची चोरी करून त्याची बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका चंदनचोराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असून चोरट्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. अशोक भाऊसाहेब गायकवाड (वय ३९ वर्षे) रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या विरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लाडगाव येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी अशोक गायकवाड हा दुचाकी (क्र. एमएच १७ जि ५४ ९०) वरून जात होता. त्यावेळी अशोकने दुचाकीवर पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये चंदनाचे झाड कापून लाकडाचे तुकडे पिशवीमध्ये ठेवले होते. पोलिसांनी त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
दरम्यान पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता वैजापूर येथून अहमदनगर जिल्ह्यात चंदनाची विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पलेपवाडा, कासोदे यांनी केली आहे.