औरंगाबाद - वामन हरी पेठे ज्वेलर्समधून लंपास केलेल्या सोन्या पैकी काही सोने राजेंद्र जैन याने जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेश सेठीला विकले होते. यानंतर सेठीने हे सोने वितळून त्याच्या विटा बनविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सेठीला अटक केली आहे. जैनने हे सोने कमी किमतीत त्याला विकले होते.
राजेंद्र जैनने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या औरंगाबाद येथील शाखेतून ५८ किलो सोने लंपास केल्याचा प्रकार समोर आला होता. यापैकी २५ ते ३० किलो सोने जैन याने जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेश सेठीला विकले होते. ते सोने वितळून राजेश सेठीने विटा आणि दागिने बनविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
यापूर्वी आरोपीने मनप्पूरम येथे तारण ठेवलेले २० किलो २४८ ग्राम सोने पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी राजेंद्र जैन व लोकेश जैन यांनी ३० किलो सोने मुथुट फायनान्समध्येही तारण ठेवले होते. जैन याने या सोन्यातील सुमारे २५ ते ३० तोळे सोने २२ हजार रुपये तोळा या दराने राजेश सेठी व त्याचा मुलगा श्रेयश सेठी या दोघांना विकले होते. सेठीने हे सोने आणखी कुणाला विकले आहे का? याचा तपास सुरू असून या प्रकरणात अजून सहा ते सात व्यापाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.