पैठण (औरंगाबाद) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद आहेत. परिणमी दुध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी घटली आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकरी डबघाईला आले आहेत. यामुळे त्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान मिळावे यासाठी भाजपाने आज (दि. 20 जुलै) राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर पैठणच्या भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शासनाला दुधाची भेट दिली आहे.
दुध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून प्रतिलिटर 10 रुपयांचा अनुदान देण्यात यावा. गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 30 रुपये भाव देण्यात यावे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध भुकटीसाठी प्रती किलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे, असे त्या निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने तातडीने दूध प्रश्नावर न्याय निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजपचे पैठण तालुका अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, माजी नगराध्यक्ष शेखर पाटील, गटनेते आंबा बरकसे, शहराध्यक्ष विजय चाटुपळे, सुनील रासणे , भाऊसाहेब बोरुडेसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.