औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यसरकारने पुण्याला हलवल्याने एमआयएमने अक्रामक पवित्रा घेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याने परिसरात गोंधळ उडाला होता.
पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर घेतली उडी -
राज्य सरकारने औरंगाबाद शहरातील क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेल्याचा आरोप करत एमआयएमने सकाळपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडले होते. यावेळी खासदार सय्यद इम्तियाज जलील हे कार्यालयात दाखल झाले. तसेच पालकमंत्री विभागीय आयुक्त कार्यालयासमोर येताच एमआयएमचा कार्यकर्ता शेख नदीम याने पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर उडी घेतली. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
'मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार' -
शिवसेनेच्यावतीने आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, क्रीडा विद्यापीठ परत मिळायला हवे, अशी माझीही मागणी आहे. विधानसभेत क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवण्यास विरोध केला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोबत घेऊन चर्चा करणार आहे. तसेच खेळाडूंवर अन्याय होवू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.