छत्रपती संभाजीनगर Marathi Board : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात मराठी पाट्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. मात्र त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला मराठी पाट्या आठवल्या असून त्यासाठी ते पुन्हा एकदा आग्रही होताना दिसून येत आहेत. याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना निवेदन दिलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक प्रतिष्ठानं, मॉल, खासगी, शासकीय कार्यालयावर इंग्रजी भाषेतील पाट्या काढून राजभाषा मराठीतील पाट्या लावण्यात याव्यात. सात दिवसात कारवाई न झाल्यास सेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.
ठाकरे गटाला मराठी पाट्यांची आठवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राज्यातील प्रत्येक आस्थापनेवर मराठीत लिहिलेल्या पाट्या असाव्या अशी मागणी करण्यात आली. तसंच न्यायालयानं आदेश देऊनही ज्या अस्थापनांनी पाट्यांवरील भाषा बदललेली नाही, अशा लोकांना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजीत पाट्या असणाऱ्या दुकानदारांना धडा शिकवला. त्यानंतर अचानक ठाकरे गटाच्या नेत्यांना मराठी पाट्यांचा आपला जुना मुद्दा आठवला. काही वर्षांपूर्वी मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी शिवसेनेनं रान उठवलं होतं आणि त्याच मुद्द्यावर त्यांनी राजकारण देखील केलं. मात्र, गेल्या काही वर्षात मराठीचा मुद्दा त्यांनी का सोडला? असा देखील प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसरीकडं त्याच मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या मनसेनं रणनीती आखली आणि त्यातच त्यांनी मराठीचा मुद्दा आपल्याकडं ओढून घेतला. त्यांच्या आंदोलनानं ठाकरे गटाला पुन्हा एकदा मराठी पाट्या आठवल्या का? असंच म्हणावं लागेल.
इंग्रजी नावाचे बोर्ड हटवा, ठाकरे गटाची मागणी : सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला असताना शहरातील अनेक प्रतिष्ठानं, मॉल, खासगी, शासकीय कार्यालयावर इंग्रजी भाषेतील पाट्या आहेत. न्यायालयानं आदेश दिलेला असतानाही संबंधित या पाट्या काढून राजभाषा मराठीतील पाट्या लावत नसल्याचं लक्षात आलंय. आदेशाचं पालन न करणाऱ्याना सुरवातीला नोटिसा देऊन व नंतर स्वतःच्या अधिकारात या पाट्या काढून घेणं आवश्यक आहे. परंतु, मनपाकडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही. मनपा प्रशासनानं येत्या 7 दिवसात इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावल्या नाही तर शिवसेना व व्यापारी महासंघ या पाट्या काढून टाकतील. यानंतर होणाऱ्या परिस्थितीला मनपा जबाबदार राहील, असा इशारा ठाकरे गटानं दिलाय. याप्रसंगी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :