छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ghrishneshwar Pilgrimage : बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचा समावेश 'प्रसाद २' योजनेत करण्यात आला आहे. भारत सरकारने धार्मिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या विकास करण्यासाठी 'प्रसाद २' ही योजना सुरू केली आहे. यात वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. तर लवकरच 'स्वदेश दर्शन २.०' या योजनेत वेरूळ आणि अजिंठा लेणीचा समावेश होईल, अशी माहिती पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. (Ministry of Tourism)
घृष्णेश्वर मंदिराचा समावेश : केंद्र सरकारच्या वतीनं २०१४-१५ मध्ये प्रसाद योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशातील विविध धार्मिक क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या "तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन" या प्रकारात घृष्णेश्वर मंदिराचा कायापालट होणार आहे. मंदिराची देखभाल, दुरुस्तीसह यामध्ये पार्किंग सुविधा, प्रसादालय, सभामंडप, स्वच्छतागृह उभारले जाणार असून तिथल्या अडचणी देखील यामुळं दूर होतील. घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेलं शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. जो पर्यंत घृष्णेश्वर मंदिरात दर्शन होत नाही तो पर्यंत परिक्रमा पूर्ण होत नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिराचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. तसा पाठपुरावा देखील करण्यात येत होता. मंगळवारी पर्यटन मंत्रालयानं याला हिरवा कंदील दिला असून त्यामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रांचा समावेश : वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराला प्रसाद योजनेत स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर आराध्य दैवत असलेले धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी आणि जालना जिल्ह्यातील राजूर गणपती मंदिराचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्यानं तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे. या आधी याच योजनेत त्र्यंबकेश्वर संस्थांचा कायापालट करण्यात आला आहे. तर अजिंठा वेरूळ ही पर्यटन स्थळं 'स्वदेश दर्शन २.०' या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे संकेत पर्यटन मंत्रालयानं दिले आहेत.
हेही वाचा: