औरंगाबाद - देशात मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारकीची शपथ घेताना औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी सर्वांचे लक्ष वेधले, कारण इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषांवर प्रभुत्व असलेल्या इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन म्हणजेच एआयएमआयएम या पक्षाकडून इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत राजकीय धक्का देत लोकसभा काबीज केली. पक्ष कट्टरवादी जहाल विचारवादी पक्ष म्हणून ओळखला जातो. अशा पक्षाचा खासदार हा हिंदी किंवा उर्दुमध्ये खासदारकीची शपथ घेईल, असे वाटत असताना इम्तियाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मराठी भाषेचा सन्मान करण्याची भाषा करणाऱ्या महाराष्ट्रातल्या खासदारांनी लोकसभेत खासदारकीची शपथ हिंदीतून घेतली. एमआयएमचे खासदार हिंदीतून किंवा उर्दूतून शपथ घेतील असे वाटत होते. मात्र औरंगाबादचे खासदार यांनी मराठीत शपथ घेत सर्वांना धक्का दिला.
एमआयएम पक्षाची प्रतिमा तशी जहाल असल्याची प्रचिती येते. प्रचारसभांमध्ये जहाल भाषणांनी तयार झालेली प्रतिमा पाहता इम्तियाज जलील यांनी सर्वांना आवाक केले. मी महाराष्ट्रात राहतो, मला माझ्या राज्यभाषेचा अभिमान आहे, मी आमदार झाल्यावर देखील मराठीत शपथ घेतली होती. त्यामुळे मी मराठीत शपथ घेतल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. मराठी भाषेचा पुळका असल्याचे भासवणाऱ्या राजकारण्यांना ही चपराकच म्हणावी लागेल.