औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील एका विहिरीत माय-लेकीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी मृतदेह सापडल्यानंतर पोलीस घटनास्थळी उशिरा का आले, असा सवाल नातेवाईकांनी केला होता. त्यांनतर या घटनेला वेगळे वळण लागले होते. घटनेतील पीडितांवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती.
आज (मंगळवार) पीडितांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह डोंगरगाव येथे आणण्यात आला. घटनेतील आरोपी शोधून तत्काळ अटक करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी जवळपास दीड तास अंत्यसंस्कार रोखून ठेवला होता. या ठिकाणी उपस्थित काही मंडळींनी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये मध्यस्थी साधल्यानंतर शोकाकुल वातावरण व पोलीस बंदोबस्तात या माय-लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा - औरंगाबादेत मायलेकीचा खून? रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह खांद्यावरून नेण्याची नामुष्की...
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कन्नड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हेत्रे, फर्दापुर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रताप बहुरे, अजिंठा पोलीस ठाण्याचे एपीआय किरण आहेर, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बिडवे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार पठाण, तलाठी राहुल पांडे आदींसह औरंगाबाद दंगा काबू पथकाची तुकडी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
हेही वाचा - मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत आढळला मृतदेह