औरंगाबाद - घरासमोर बांधलेले श्वान चोरी करून ते इतर शहरात नेऊन विकणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. अशीच एक घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर क्रांतिचौक पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतील घरासमोर बांधलेले उच्च प्रजातीचे श्वान अचानकपणे बेपत्ता होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलसमोर बांधण्यात आलेला श्वान बेपत्ता झाला. त्यानंतर हॉटेल मालकाने परिसरातील सीसीटीव्ही पाहिली असता तीन जणांची टोळी श्वानाची चोरी करून घेऊन जाताना दिसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यात बांधलेले उच्च प्रतीचे श्वान चोरी करून त्यांची चढ्या दरात इतर शहरात विक्री करत होती. या संशयितांचे अजून दोन साथीदार फरार असून क्रांतिचौक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीने शहरातील शंभरावर श्वानांची चोरी केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.