औरंगाबाद - चिकलठाणा परिसरातील दुर्गामाता दवाखाना येथे एका बोगस बंगाली डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. नयन ढाली असे कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. नयन ढाली हा कोणतीही शैक्षणिक पात्रता नसतानाही मूळव्याध, भगंदर यासह इतर विविध आजारांवर उपचार करत होता.
विनापरावाना करत होता उपचार -
चिकलठाणा परिसरातील सावित्री नगर येथे एक बोगस बंगाली डॉक्टर मूळव्याध, भगंदर यासह विविध आजारांवर उपचार करत असल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीवरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने नयन ढाली याच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी केली. या चौकशी अहवालात हा त्याच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. त्यानंतर या बोगस डॉक्टरवर भारतीय दंडसंहिता 1860 कलम 419 व 420 व महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम 1961 कलम-33, 33अ, 36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, वॉर्नरसोबत 'हा' खेळाडू संघातून बाहेर!