छत्रपती संभाजीनगर Cabinet Meeting In Sambhaji Nagar : राज्य मंत्रिमंडळाची दोन दिवसीय बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेत. या बैठकीच्यावेळी विविध मागण्यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विविध संघटनांनी त्यांच्या मागण्यासाठी क्रांती चौकात मोर्चा काढला.
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देखील मोर्चा काढण्यात आला. सरकारनं दुष्काळ जाहीर करावा, रब्बी, खरीप हंगामातील पीक विम्याची संपूर्ण रक्कम भरावी, शेतकर्यांची कर्जमाफी करावी अशा मागण्यासाठी त्यांनी यावेळी मोर्चा काढला.
बोगस प्रमाणपत्रासंदर्भात एसआयटी स्थापन करा : बंजारा समाजाच्या वतीनं पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मोर्चा काढला. जात प्रमाणपत्रासाठी होणारी घुसखोरी थांबवावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडं केलीय. बोगस प्रमाणपत्रासंदर्भात एसआयटी समिती स्थापन करावी, तसंच बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्याला शिक्षा करावी असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसंच धनगर समाजानं देखील यावेळी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केलीय.
16 वर्षात फक्त दोनच बैठका : मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यापूर्वी 2016 मध्ये मराठवाड्याच्या समस्यांबाबत संभाजीनगरमध्ये (तत्कालीन औरंगाबाद) मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. तर 2008 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात एकदा मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. म्हणजे 16 वर्षात मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दोनच बैठका झाल्या आहेत.
35 सिंचन प्रकल्प मंजूर : आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मराठवाड्यानं मोठी झेप घेतली आहे. वर्षभरात आमच्या सरकारनं घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर ठेऊन घेतले आहेत. शेतीला पाण्याची गरज असल्यानं आतापर्यंत आम्ही 35 सिंचन प्रकल्प मंजूर केले. त्यामुळं आठ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली. आम्ही फक्त घोषणा करत नाही, तर अंमलबजावणी करतो. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मराठवाड्याचं वाहून जाणारे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून असल्यानं त्याचा फायदा मराठवाड्याला होणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा -