औरंगाबाद - उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजप शिवसेनेला बाजूला ठेवून जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागली आहे. मात्र, भाजप जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेसह राष्ट्रवादी आणि मनसे या पर्यायांचा विचार करत असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांनी स्पष्ट केले आहे. आज भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची एक बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक सदस्य असूनही काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती. अवघ्या काही दिवसात विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगणकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - ...म्हणून औरंगाबाद महापालिकेतील भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा
राज्यात शिवसेनेने महायुतीतून काढता पाय घेतल्यानंतर स्थानिक राजकारणावर त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेना-भाजप मिळून जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन करतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता शिवसेना शब्द फिरवत असल्याने विश्वासघात केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाल्याचे कराड यांनी म्हटले आहे.