औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामान्यांसोबत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील घरीच राहणे पसंत केले. नेहमी कार्यकर्ते आणि मतदारांच्या घोळक्यात रमणारे राहिभाऊ सध्या आपल्या आयुष्यातील आठवणी लिहून संग्रहित करण्याचे काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. इतकंच नाही तर सर्वांनाच घरात बसण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भाजपचे आमदार, खासदार घरीच बसून आपली राहिलेली काम आणि आपले छंद जोपासताना दिसून येत आहेत. आपल्या आयुष्यात कधीही निवांत न बसलेले हरिभाऊ बागडे आज निवांत क्षण घालवताना दिसून आले.
सकाळी लवकर उठून तयार होऊन कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारे आणि जनतेचे काम करणारे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ आज आपली राहिलेली काही काम करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हरिभाऊ बागडे 22 तारखेच्या जनता कर्फ्युच्या दिवसापासून आपल्या घरातच आहेत. नेहमी लोकांमध्ये मिसळण्याची सवय असल्याने घरी काहीस बोर होत असल्याचं हरिभाऊ यांनी सांगितलं. रोज सकाळी वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. मात्र, वर्तमानपत्र सध्या बंद असल्याने मोबाईलवरच वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न करतो. इतक्या वर्षात जीवनात असलेल्या अनेक आठवणी लिहून संग्रहित करून ठेवत आहे. काही वेळ वाचन करून आणि काही काळ टीव्हीवरच्या बातम्या पाहून दिवस घालवत असल्याचा अनुभव हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. दुपारी कधी अराम करण्याचा किंवा झोपण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र, सध्या दुपारी झोपतो. खरेतर झोप साठवून ठेवावी वाटते. मात्र, तसे करू शकत नाही. अनेक वर्षांमध्ये अनेक कार्यकर्त्यांशी म्हणावा तसा संवाद साधता आला नाही. रिकाम्या वेळेत आता सर्वांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांची चौकशी करत आहे. इतकंच नाही तर कोरोनाची भीती दूर होईपर्यंत काळजी घेण्याचा सल्ला देत असल्याचा अनुभव माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितला.