औरंगाबाद - जिल्ह्यातील नवीन कायगाव येथे भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्टिंग ऑपरेशन करून या भोंदू बाबाचा गोरखधंदा समोर आणला आहे. यानंतर वैजापूर पोलिसांनी लोकांना फसवणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात नवीन कायगाव येथे विजय अप्पासाहेब भोगे (वय अंदाजे 32) या भोंदूबाबाने आपल्या शेतात गोरखधंदा सुरु केला होता. तो किडनीचे आजार बरे करणे, निपुत्रिकांना मुले होण्यासाठी उपचार करणे, असाध्य रोग बरे करणे तसेच इतर तत्सम समस्यांचे निराकरण निंबू व भंडारा देऊन करतो अशी बतावणी देत होता आणि याप्रकारे लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत होता. याबाबतची तक्रार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती औरंगाबाद शाखेच्या शहाजी भोसले यांच्याकडे आली होती.
त्या आधारे शहाजी भोसले यांनी समितीच्या सदस्यांसोबत जाऊन शहानिशा केली. त्या सदस्यांना तक्रारीत तथ्य असल्याचे जाणवले. त्यांनी या भोंदू बाबाचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये तो बाबा अंधश्रध्द लोकांकडून पैसे उकळत असल्याचे निदर्शनात आले. येथे दोनशे रूपयापर्यंत रकमेला पावती दिली जाते. मात्र त्या पावती बुकवर कोणताही रजिस्टर नंबर नाही. मोठ्या रकमांना पावती दिली जात नाही, मात्र नोंदवहीत नाव नोंदविले जाते.
हे सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांच्या शिष्टमंडळाने गंगापूर येथे जाऊन पोलिसात यांसदर्भात पुरावे सादर करून तक्रार दिली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी विजय अप्पासाहेब भोगे या भोंदूबाबाला अटक केली आहे. या बाबाने अजून किती जणांना फसवले आहे, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.