छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : बँकेत कुठलाही घोटाळा झाला नसून लेखा परीक्षकाने न विचारता परस्पर अहवाल तयार केल्याने अडचण निर्माण झाली आहे. ग्राहकांची कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही. सर्वांचे पैसे लवकरच देण्यात येतील, असे स्पष्टीकरण अटकेत असलेल्या आदर्श बँकेचे संचालक अंबादास मानकापे यांनी दिले. शुक्रवारी रात्री अंबादास मानकापे यांना सिडको पोलिसांनी अटक केली असून त्यांना शनिवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
घोटाळा झालाच नसल्याचा अध्यक्षांचा दावा : आदर्श बँकेचे संचालक अंबादास मानकापे यांना सिडको पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. माझी कुठलीच चूक नसून ऑडिटरने चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे यात कुठलीही चूक नाही, असे त्यांनी सांगितले. एका ठेवीदाराने आत्महत्या केल्याचे त्यांना विचारले. त्यावर असे करण्याची काही गरज नाही. सर्वांचे पैसे त्यांना मिळतील असा दावा त्यांनी केला. मात्र, पोलिसात अनेक तक्रारींचा पाऊस सध्या पडत आहे. त्यामुळे मानकापे यांच्यावर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा ठपका लावण्यात आला आहे.
इतर संचालक फरार : दोनशे कोटीहून अधिक कर्ज वाटप केल्याने आदर्श बँक अडचणीत आली आहे. त्यावर सहकार विभागाने सिडको पोलिसात गुन्हा दाखल केला. बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक करण्यात आली असली तरी, इतर संचालक मात्र अजून पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. तर कर्जवाटप संबंधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप ग्राहकांची फसवणूक केल्याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. अनेक खातेदारांनी मात्र पोलिसांकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यावर एकत्रितरीत्या गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिलावंत नांदेडकर यांनी दिली.
हेही वाचा: