औरंगाबाद - ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या पुजनाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. राजबाजार परिसरात सकाळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते विधिवत आरती आणि पूजन करून संस्थान गणेशाची मूर्ती चांदीच्या रथात ठेवण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली.
संस्थान गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत सेना नेते चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. संस्थान गणपती शहराचे ग्रामदैवत असून शहरातील गणेशोत्सवाला संस्थान गणपतीच्या पुजनाने सुरुवात होते. इतकंच नाही तर शहरातील सर्व धार्मिक सण आणि राजकीय नेत्यांच्या सभा संस्थान गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय सुरू होत नाही, असं संस्थान गणेशाचे महत्त्व आहे.
दुपारी 12 च्या सुमारास माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अतुल सावे, आमदार डॉ अंबादास दानवे, संजय शिरसाठ महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जनाच्यावेळी मराठवाड्यातील दुष्काळ दूर होऊ दे आणि चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना चंद्रकांत खैरे यांनी संस्थान गणेशाकडे केली.