औरंगाबाद- शहरातील बिडबायपास देवळाई भागात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरीला गेल्याची खळबळजन घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या दिड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हा कारनामा केला आहे. या एटीएम मशीनमध्ये २५ लाख रुपये असल्याची माहिती माहिती पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे यांनी दिली.
शहरातील देवळाई भागात एसबीआय बँकेचे एटीएम केंद्र आहे. रात्रीच्या सुमारास येथील रस्त्यावर फारशी रहदारी नसते. याचाच फायदा घेत स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चार चोरट्यांनी एटीएम मशीन पळवून नेले आहे. ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱयावर स्पे मारून फोडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनेचे चित्रण येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले नाही.
चोरट्यांनी एटीएम मशीन उखडून ते स्कॉर्पिओमध्ये टाकले आणि घटनास्थळावरून पोबारा केला. एटीएम मशीन चोरी करून हे चोरटे जालना-बीड रस्त्याने पसार झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आज या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी संबंधित बँक अधिकाऱ्यांनी चोरी गेलेल्या एटीएममध्ये सुमारे २५ लाखांची रोकड असल्याची माहिती दिली.चोरी झालेल्या एटीएम वर यापूर्वी देखील वर्षभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता त्या नंतर देखील सुरक्षा रक्षक नेमण्यात आले नव्हते. सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यानी संधी साधली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.