औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक ३ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष पद मिळवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण औरंगाबाद जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले असल्याने शिवसेनेने अध्यक्षपद घेतल्यानंतर काँग्रेसला संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत पक्ष श्रेष्ठींनी अद्याप निर्णय न घेतल्याने अध्यक्षपदाचा मान कोणत्या पक्षाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत जिल्हा परिषद ताब्यात घेतली. काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने तो गट घेऊन सत्ता घ्यायची या हेतूने भाजप रणनीती आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक लक्षवेधी मानली जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ३ तारखेला मतदान होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सूत्र आहे. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ते अडीच वर्षांआधीच आले होते. त्यावेळी शिवसेनेचा अध्यक्ष तर काँग्रेसचा उपाध्यक्ष झाला होता. त्यावेळी २४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस एकत्र आली होती. आता त्यांची मुदत संपल्याने पुन्हा निवडणुका होणार आहे.
यावेळीही महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. मात्र, अध्यक्ष कोण होणार याबाबत अंतिम निर्णय रात्री उशिरा मुंबईत होणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १८, काँग्रेसचे १६, भाजपचे २४, राष्ट्रवादीचे २, मनसेचा १ आणि १ अपक्ष सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा विजय निश्चित दिसतो. फक्त अध्यक्ष पुन्हा शिवसेनेचाच होणार की, काँग्रेसचा हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.
हेही वाचा- एमआयएमच्या ६ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी