औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम राबवत आहे. आज औरंगाबादमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरेंनी आगामी काळात निवडणूक लढवू, असे वक्तव्य केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आदित्य संवाद नावाचे एक वेगळे अस्त्र मैदानात उतरवले आहे. मागील काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी अनेक वेळा युवकांशी संवाद साधला. याच धर्तीवर शिवसेना 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम राबवत आहे. राज्यात ५ ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून, याची सुरुवात औरंगाबादपासून झाली. शहरातील सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात युवकांनी महिला सुरक्षा, शिक्षण, आणि आरोग्य या सर्वांवर ठाकरे यांचे मत जाणून घेतले.
या कार्यक्रमामध्ये युवकांनी आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मात्र, ठाकरे यांनी घरी विचारून सांगतो असे उत्तर दिले. पुढे ते म्हणाले, आपल्याला निवडणूक लढवायला आवडेल. मात्र आता नाही. पण आगामी काळात आपण निश्चित निवडणूक लढवू, असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही युवकांनी औरंगाबादच्या समस्यांवर देखील लक्ष केंद्रित करत ठाकरेंना जाब विचारला. यावर ठाकरेंनी आपण कोणती-कोणती कामे केली याचा पाढा वाचत मूळ प्रश्नांना बगल दिली.