औरंगाबाद - जिल्ह्यातील सिल्लोडचे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेना प्रवेश भाजप पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले आहे. सत्तार यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होऊन काही तास उलटत नाही तोच सोयगाव पंचायतच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्यावर भाजपने अविश्वास आणला आहे. तर तो मंजूरही झाल्याने मोठे धक्कातंत्र भाजप कडून दिल्याचे बोलले जाते आहे.
हेही वाचा - अब्दुल सत्तारांच्या हाती 'शिवबंधन'; मातोश्रीवर केला सेनेत प्रवेश
इतर सदस्यांच्या मदतीने भाजपने आणलेला अविश्वास ठराव 13 विरुध्द शून्य मतांनी मंजूर करण्यात आला आहे. नगरपंचयतीमध्ये भाजपशी युती असताना शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावर अध्यक्षपद मिळवले होते. 2015 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत सोयगावमध्ये शिवसेना-भाजप युती होती. दोघांनीही अडीच-अडीच वर्ष अध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरवला होता. पहिल्या टर्मला भाजपचे कैलास काळे हे अध्यक्ष झाले होते. मात्र, भाजप सदस्यांची संख्या जास्त असूनही जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस असे समीकरण तयार झाले. त्यानंतर हाच फॉर्म्युला वापरून सोयगाव नगरपंचायतीत देखील शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तार समर्थक काँग्रेस सदस्यांचा पाठिंबा घेत प्रतिभा बोडखे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
हेही वाचा - काँग्रेसचे अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंची घेतली भेट
सेनेची ही खेळी जेरीस लागल्यानंतर देखील पक्षाने शांत राहण्याचा सल्ला दिल्याने कुठलेही पाऊल उचलले नव्हते. त्यात काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर सत्तार भाजप मध्ये येतील अशी शक्यता निर्माण होताच सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला. मात्र, सत्तार यांनी भाजपच्या मित्रपक्षात प्रवेश केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार आणि सेनेला धक्का दिला. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने नाराज झालेल्या तीन व काँग्रेसच्या एक सदस्यांच्या सोबतीने भाजपच्या नऊ नगरसेवकांनी अध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता.
आज (मंगळवारी) त्यावर सुनावणी होऊन तो 13 विरुध्द शून्य मतांनी मंजूर करण्यात आला. यावेळी शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य गैरहजर राहिले. तर येत्या दहा दिवसांत नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. भाजप या पदावर कुणाची वर्णी लावणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.