पैठण (औरंगाबाद) - तालुक्यातील पाचोड पासून हाकेच्या अंतरावर पाचोड बायपास जवळील शेत वस्तीवर अज्ञात नऊ ते दहा चोरट्यांनी जवळपास एक तास धुमाकूळ घालत शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. तसेच या शेतकऱ्याकडून अंदाजे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी 16 ऑक्टोबरला रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पाचोड येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव भुमरे यांची पाचोड शिवारातील गट नंबर 158मध्ये शेती आहे. गेली 14 वर्षांपासून ते आपल्या शेत वस्तीवर राहून शेतीत कष्ट करून परिवार चालवतात. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते, त्यांची पत्नी ठकुबाई भुमरे आणि नातू प्रथमेश भुमरे हे जेवण करून झोपी गेले होते. यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या जनावरांना चारा टाकण्यासाठी ज्ञानेश्वर भुमरे हे उठले. चारा टाकून परत घरात झोपायला गेल्यानंतर काही वेळातच अज्ञात चोरट्यांनी दारावर दगड मारत दार तोडून घरात प्रवेश केला. यावेळी मारहाण केली आणि घरात ठेवलेले सोन्याची दागिने, नगदी दीड लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये लंपास केरत तेथून पळ काढला.
चोर गेल्यानंतर नातू प्रथमेश भुमरे याने आपल्या हिमतीने घरावरील पत्र उचकटून कुलरवर उभा राहून बाहेर आला. घराची कडी उघडून आम्हाला बाहेर काढले, अशी माहिती जखमी शेतकरी ज्ञानेश्वर भूमरे यांनी दिली. बाहेर आल्यानंतर जवळच असलेल्या बाळू भालसिंग यांच्या घरी जाऊन त्यांनी झालेला प्रकार सांगितला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देत उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांनी घटनास्थळाची भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच पाचोड पोलिसांना पुढील तपासाबाबत आदेश दिले आहेत.
एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसाने शेतकरी हाताशी आलेला घास हिरावून गेल्याने मोठ्या संकटात सापडला आहे. त्यात अशा घटनांनी शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन महिन्यांआधी कोरोना तापसीच्या नावाखाली अज्ञात दोन चोरट्यांनी गळ्यातील साखळी आणि अंगठी, तर दुसऱ्या घटनेत शेतकऱ्याला मारहाण करून 60 हजारांचे ऐवज लंपास केले होते. त्या प्रकरणातील आरोपीचा तपास न लागला नाही. याप्रकारे आतापर्यंत 9 ते 10 अज्ञात आरोपींना अटक करण्याचे आव्हान पाचोड पोलिसांसमोर आहे.