अमरावती - दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही जिल्ह्यातील काही भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. ही पाणीटंचाई निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर वीजटंचाई, प्रशासनातील गलथानपणा, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर यामुळे भासत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जून महिना सुरू असून काही ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळला. परंतु तरीही जिल्ह्यातील या गावांमध्ये अजूनही पाण्यावरून स्फोटक स्थिती कायम आहे. त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक आहे. या ६७ गावांपैकी अठरा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गेल्यावर्षी दिलेला हात यामुळे विदर्भातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठीच भर पडली असून अमरावती जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे.
मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा, दर्यापूर-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूर आणि ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहेत. परंतु तरीही धारणी आणि चिखलदरा हा मेळघाटचा प्रदेश तसेच मोर्शी तालुक्यातील काही भाग हा दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करीत असतो. यंदाही मोर्शी तालुक्यातील सर्वात जास्त गावे ही टंचाईग्रस्त आहेत. सध्या पाणी टंचाई ज्या गावात निर्माण झाली, त्या भागांना पाणी देण्यासाठी १८ टँकर सतत फेऱ्या घालीत आहेत. यामध्ये १७ टँकर हे एकट्या चिखलदरा तालुक्यातील गावांमध्ये लावण्यात आले आहे. तर चांदुर रेल्वे तालुक्यात एका टँकरने पाणी पुरवठा केला जातो.
उपाययोजनांसाठी धावपळ -
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने यासाठीचा आराखडा तयार केला असून , तो खर्चाच्या मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. तत्पूर्वी या आराखड्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारितील नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाकडे आराखडा सादर करावा लागतो. त्यानंतर जिल्हास्तरीय मान्यता समिती या आराखड्याला अंतीम मंजुरी देत असते.
टंचाईग्रस्त गावे -
तालुका गावे
अमरावती ४
नांदगाव खंडेश्वर २
भातकुली २
तिवसा १०
मोर्शी ११
वरुड ९
चांदूर रेल्वे २
धामणगाव रेल्वे ६
अचलपूर १
चांदूर बाजार ७
अंजनगाव सुर्जी ०
दर्यापूर ०
धारणी ४
चिखलदरा ९
एकूण ६७