अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्या श्री विलास कॉलनी येथील निवासस्थानी भेट देऊन बंड कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते अशी संजय बंड यांची ओळख होती. वलगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग तीन वेळा नेतृत्व केले होते. १३ डिसेंबर २०१८ रोजी संजय बंड यांचे आकस्मिक निधन झाले होते.
शुक्रवारी भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या संमेलनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे अमरावतीत आले. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत संजय बंड यांच्या श्री विलास कॉलनी येथील घरी जाऊन संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड, आई चंद्रकला बंड यांची भेट घेतली. शिवसेना बंड कुटुंबीयांसोबत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंड कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे आदी उपस्थित होते.