अमरावती - शहरात शुक्रवारी (दि. 24 जुलै) 58 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या मुख्य परिचारिकेला कोरोना झाल्याने रुग्णालयात खळबळ उडाली असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज (दि. 25 जुलै) आणि रविवारी (दि. 26 जुलै) दोन दिवस जिल्ह्यात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1 हजार 608 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 497 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 483 रुग्णांवर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे तर 14 जणांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. कोरोनामुळे अमरावतीकर हादरले असताना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील मुख्य परिचारिकेला कोरोनाची लगण झाल्याने खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरात गुलिस्ता नगर, गोपाल नगर, हमलपुरा, राहून नगर, नवाथेनगर, सुरजनगर, जयभरात नगर, जेवड नगर, साई नगर, सोनल नगर, सरस्वती नगर लालखडी, चपराशिपुरा, शिवशक्ती नगर, हबीब नगर, श्रीकृष्णपेठ, बुधवरा, अंबिकनगर, कृष्णा नगर, नमुना गल्ली, वडाळी नाका येथील निधी व साक्षी अपार्टमेंट यांसह वालगाव, नेर पिंगळाई , अचलपूर, भातकुली, कुऱ्हा याठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे. यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज व उद्या संचारबंदी घोषित केली आहे.
राज्यात शुक्रवारी (दि. 24 जुलै) 9 हजार 615 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता 3 लाख 57 हजार 117 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 1 लाख 43 हजार 714 सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.