अमरावती- राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहे. शेतातील पेरणी हा शेतकऱ्यांसाठी एक उत्सव असला तरी जबाबदारीचे काम आहे. शेतात पेरणी करण्यापूर्वी शेतकरी पूजा करतात. मेळघाटमध्ये पावसाळा आला की, आदिवासी बांधवांच्या नववर्षाला सुरवात होते. मेळघाटात होणारी भवाई पूजा म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवात असल्याचे येथील आदिवासी मानतात.
नव्या पिढीला शेतीचे संस्कार
भवाई पूजेदरम्यान गावातील खेडा मुठवा येथे बियाण्याचे पूजन होते. बांबूच्या काठीचे पूजन होते. लहान मुले मोठी माणसे एकत्र येतात. शेती कामाची मजुरी ठरवली जाते. वर्षभराची परिस्थिती कशी असेल? गाव गाडा कसा चालवावा याबाबत चर्चा केली जाते. घरात गोड शेवळ्या खाल्या जातात. बाश्याच्या पेरातून, एकमेकाला घासून अग्नी निर्माण केला जातो. प्रत्येक घरी हा अग्नी नेऊन मग चुली पेटवल्या जातात. त्यावर स्वयंपाक केला जातो. लहान मुले मोठ्या माणसांचे पात्र करत भूमकाने दिलेली सर्व पिकांचे बीज पेरणी करतात. नव्या पिढीला या निमित्ताने शेतीचा संस्कार शिकवला जातो.
वन विभागाने आवाहन
भवाई पूजा, निसर्ग पूजा यात जंगलाप्रती, वृक्षाप्रती आदर व्यक्त केला जातो, त्याचे पूजन केले जाते. तर निमित्ताने रोप लागवडीचा विचार लोकांमध्ये रुजवयाचा म्हणजे लोकांना या दिवसानिमित्त किंवा यादरम्यान आंबा, मोहा, बास, जांभूळ आवळा ही रोपे देण्याचे नियोजन अंगार मुक्त जंगल अभियानातून केले आहे. लोकांनी ही रोपे शेतीच्या धुऱ्यावर लावावी त्याची काळजी घ्यावी. पिकाबरोबर ही रोपे वाढवावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
वनरक्षक चंद्रशेखर थोटे यांनी जात कासाईखेडा गावच्या भवाई पूजेत एक नवा विचार, नवी कृती लोकांच्या मनात रुजवली. मागील काही दिवसापासून थोटे यांनी आपणही आपल्या जंगलातील झाडांचे बियांचे पूजन गावच्या भवाई पूजेत करावे आणि त्यांनी वन मजुरांच्या साहाय्याने बीज संकलनाची सुरवात केली. मोहा, जांभूळ, चारोळी, आंबा, कडाई, आजन, कडुनिंब, बोर, आवळा, चिंच आशा महत्वाच्या प्रजाती बिया गोळा केल्या. थोटे यांनी ह्या सर्व बिया पूजेत ठेवल्या. गाव पंचायत प्रमुख गावकरी यांनीही ह्या बियांचे पूजन केले. शेतीच्या बियाण्यांची पूजा तर आपण करतोच. झाडांच्या बियांचीही पूजा केली पाहिजे. त्यातून नवे जंगल निर्माण होते. ही जंगले आपला जगण्याचा आधार आहेत. हा विचार भवाई पूजेनिमित्त रुजवला जात आहे. कोहाना, सोसोखेडा, कंजोली, धारणमहू, मोथाखेडा, अशा विविध गावात नुकताच भवाई पूजा संपन्न झाली.