अमरावती - जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे दागिन्यांचे दुकान फोडून 31लाख 60 हजार किमतीचे दागिने आणि रोख रक्कम 10 लाख रुपये चोरणाऱ्या तीन चोरट्यांना शनिवारी अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तीनपैकी दोघांना मुंबईतून आणि एका आरोपीला जालना येथून ताब्यात घेण्यात आले.
शिवासिंग वीरसिंग दुधानी शिकलकर (वय 27 रा. आंबोली जिल्हा ठाणे) मुख्तारसिंग जीवनसिंग टाक (वय 32 रा. वडाळी कॅम्प अमरावती) आणि तारासिंग छगणसिंग भोंड रा. गुरुगोविंदसिंग नगर जालना असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्या सोबत असणारे आणखी दोघे अद्याप फरार आहेत. पाच जणांच्या या टोळीने 9 ऑगस्टच्या मध्यरात्री चांदूरबाजार येथील धनंजय सापधरे यांचे भवानी ज्वेलर्स टॉमी आणि कटरच्या साहाय्याने फोडून 600 ग्रॅम सोने, 10 किलो चांदी आणि 10 लाख रुपये रोख चोरून नेले.
याबाबत चांदूरबाजार पोलिसांत धनंजय सापधरे यांच्या तक्रारावरून गुन्हा नोंद झाला होता. पोलीस अधीक्षक एस बालाजी यांच्या मार्गदर्शनात एकूण पाच पथक तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात आला. चोरट्यांनी दागिन्यांचे डबे बाळापूरजवळ रिधिरा येथे फेकले होते. हे चोरटे नागपूर, कोंढाली, कारंजा, तळेगाव, वरुड येथून चांदूर बाजरला पोहचले होते. 7 आणि 8 ऑगस्टच्या रात्री आसेगाव येथे चोरीचा प्रयत्न फसला होता. चांदूरबाजार येथे चोरी केल्यानंतर चोरटे मुंबईच्या दिशेने पसार झाले.
अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने 16 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात आंबोली परिसरात एका घरात दडून बसलेल्या शिवासिंग विरसिंग दुधानी याला अटक केली. त्याच्याजवळून 13 तोळे सोने, 800 ग्रॅम चांदी आणि 39 हजार रुपये रोख सापडले. त्याच दिवशी अंबरनाथ येथे मुख्तारसिंग जीवनसिंग टाक असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यालाही अटक केली. तसेच जालन्यातून तारासिंग छगणसिंग भोंड याला ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना शनिवारी अमरावती येथे आणण्यात आले.
पोलीस अधीक्षक एस बालाजी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किंगे यांच्या मार्गदर्शांत सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कडबे, त्रिंबक मनोहर, गजेंद्र ठाकरे, प्रमोद खर्चे, प्रवीण आंबाडेकर, मूलचंद भांबुरकर, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, वाहनचालक सुनील तिडके आणि नितेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली.