अमरावती - शासकीय विदर्भ ज्ञान महाविद्यालयातील वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजताच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. विद्यार्थ्यांना वीज, पाणी, स्वच्छता या प्राथमिक सुविधा सुरळीत मिळाव्या, ही या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अमरावती शहरातील नामांकित शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयात विदर्भातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अनेक विद्यार्थी हे बाहेर गावचे असल्याने ते याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात वास्तव्यास आहेत. परंतु, या वसतिगृहात शुद्ध पाणी, वीज, स्वच्छता आदी मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना सुरळीत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला होता. विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे महाविद्यालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.