अमरावती Special Story of courtyard garden : लाल, पिवळी, पांढरी, गुलाबी, निळी, जांभळी, हिरवी अशा विविध रंगात 35 प्रकारची शेवंतीची फुलं अमरावती शहरातील गनेडिवाल लेआउट परिसरात असणाऱ्या डॉक्टर इंदिरा इंगोले यांच्या घराच्या अंगणात बहरली आहे. शेवंतीसह अतिशय दुर्मीळ फुलांच्या झाडांसह साडेचारशे लहान मोठ्या झाडांनी त्यांची बाग फुलेली आहे. लहानपणापासूनच बागकामाची आवड असणाऱ्या डॉक्टर इंदिरा इंगोले या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्वेद ज्ञान संस्था येथून 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या अंगणातील बाग फुलवण्यासाठी त्या रोज चार तास स्वतःला वाहून देत आपली आवड जोपासत आहेत.
असं केलं जातं शेवंतीचं संगोपन : डॉक्टर इंगोले सांगतात, 'मला सर्व फुलझाडांपैकी शेवंती फार आवडते. माझ्याकडे यावर्षी 35 प्रकारच्या शेवंती बहरल्या आहेत. शेवंतीची सर्वच प्रकारची फुलं ही एक सारखीच असतात. मात्र थोडाफार रंगांचा फरक या फुलांमध्ये दिसतो. हिरवी शेवंती ही अतिशय दुर्मीळ असून माझ्याकडे ती छान फुलली आहे. यांचा बहार गेल्यावर ही सर्व झाडं उन्हाळ्यात टिकवून ठेवणं फार कठीण काम आहे. पावसाळा आल्यावर या झाडांना नव्या फांद्या येतात. त्या फांद्या कापून पुन्हा त्या कुंडीत लावाव्या लागतात. नेमक्या कोणत्या रंगाच्या शेवंतीची कोणती कुंडी असावी यासाठी मी प्रत्येक कुंडीवर क्रमांक लिहून त्या क्रमांकानुसार दुसऱ्या रिकाम्या कुंडीवरील क्रमांकाप्रमाणे ती दरवर्षी लावते,' असं डॉ. इंदिरा इंगोले 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या. शेवंतीचं हे सर्व काम घराच्या वरच्या गच्चीवर केलं जातं. आता शेवंती भरली असून या सर्व कुंड्या हळूहळू आम्ही खाली आणून ठेवतो असं देखील डॉ. इंदिरा इंगोले यांनी सांगितलं.
वड, पिंपळ आणि चिंचेचे बोन्सय : वडाचे 35 वर्ष वयाचे झाड बोन्साय स्वरूपात डॉक्टर इंदिरा इंगोले यांच्या घरातील अंगणात असलेल्या कुंडीत बहरले आहे. या वडाच्या झाडाच्या पारंब्या देखील कुंडीमध्ये छानशा दिसतात. वडासह पिंपळ आणि चिंचेच्या वृक्षाचे बोन्साय देखील त्यांच्या अंगणात लक्ष वेधून घेतात.
बर्ड ऑफ पॅराडाईज आहे खास आकर्षण : डॉक्टर इंगोले यांच्या अंगणातील बागेत 'बर्ड ऑफ पॅराडाईज'चे तुरे हे खास आकर्षण आहेत. पांढऱ्या गुलाबी रंगाचे हे तुरे अतिशय सुंदर असून एकाचवेळी आठ ते दहा तुरे झाडाला येतात. सध्या एकाच झाडाला छानसा तुरा आला असून आपल्या बागेची शोभा या 'बर्ड ऑफ पॅराडाईज' मुळेच अधिक वाढते असे डॉक्टर इंदिरा इंगोले म्हणाल्या. यासोबतच निवडुंगाचे विविध प्रकार या बागेत पाहायला मिळतात. अगदी लहान आकाराच्या चेंडू सारखे निवडुंग तसेच काकडी सारखे सरळ लांब वाढलेले निवडून देखील इंगोले यांच्या बागेत लक्ष वेधून घेतात. घराच्या अंगणात प्रवेश करताच डॉक्टर इंदिरा इंगोले यांनी मातीने तयार केलेल्या खास रोबोटमध्ये वाढलेले निवडूंग प्रत्येकाला आकर्षित करणारे असेच आहेत. त्यांच्या अंगणात 12 प्रकारचे निवडुंग आहेत.
बागेत उडतो आहे कारंजा : वैद्यकीय क्षेत्रात हयात गेलेल्या डॉक्टर इंदिरा इंगोले यांना बाक कामासह स्वतःच्या हाताने बांबू पासून साहित्य निर्माण करणे चित्रकला आणि दगडांपासून विविध कलाकृती निर्माण करण्याचा देखील छंद आहे. त्या ज्या भागात फिरायला गेल्या त्या सर्व भागातून त्यांनी विविध प्रकारचे दगड वेचून आणलेत. या दगडांच्या कलाकृतीतून त्यांनी स्वतः बागेतच पाण्याचा कारंजा तयार केला. या कारंजा जवळच त्यांनी स्वतः दगडात घडवलेले कापसाचे शिल्प अतिशय सुंदर आहे. एकूणच घराच्या प्रवेशद्वारापासून घराच्या दुसऱ्या माळ्यावरील छतापर्यंत जिकडे तिकडे झाडं आणि वेलींनी डॉ. इंगोले यांचे घर सजले आहे.
1970 मध्ये झाल्या एमबीबीएस : बागकामाची प्रचंड आवड असणाऱ्या डॉक्टर इंदिरा इंगोले-लडके या 1970 मध्ये नागपूर येथून एमबीबीएस झाल्या. त्यानंतर काही वर्ष त्यांनी मुंबईत भूलतज्ञ डॉक्टर म्हणून सेवा दिली. अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात त्या ॲनाटॉमी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. सेवाग्राम येथील आयुर्वेद ज्ञान संस्था येथे देखील त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मोबाईलमुळे गर्भवती महिलांवर होणाऱ्या दुष्परिणामावर संशोधन करून आचार्य पदवी देखील मिळवली आहे. 2017 मध्ये त्या सेवाग्राम येथून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपली बागकामाची आवड जोपासली. त्यांच्या ह्या आवडीला त्यांचे पती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. व्ही.टी. इंगोले यांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं.
हेही वाचा :