अमरावती - कोरोना विषाणूचा संसर्गामुळे राज्यभरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आदेश सरकारने दिले असताना अमरावती येथील एसडीएफ इंग्लिश स्कूलमध्ये चक्क इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अगदी घरालागतच ही शाळा असून, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे.
कोरोनामुळे सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग बंद असून प्रशासनाने गर्दीच्या सर्व ठिकाणी बंद करण्याचे निर्देश दिले आहे. असे असताना, एसबीएफ इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा उद्योग केला आहे.
त्यामुळे एकाच वर्गामध्ये अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी एकत्रित आले असून हा प्रकार सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारा ठरला आहे. तर, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रताप एसडीएफ इंग्लिश शाळा प्रशासनाने केला असल्याचे शाळा परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
याप्रकरणी, शाळेचे अध्यक्ष विजय देऊसकर यांनी नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांची परीक्षा घेण्यात आल्याचे बोलताना स्पष्ट केले. तर, प्रशासनाच्यावतीने आता या शाळेवर त्यांची कुठली कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, विजेच्या कडकडाटासह गारपीट