अमरावती - गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या कीर्तनाच्या माध्यमातून देव माणसात ओळखा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगे महाराज यांनी 65 वर्षांपूर्वी 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव ते अमरावती मार्गावर असणाऱ्या पिढी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला होता. समाज प्रबोधनाच्या उद्देशाने मुंबई नाशिक पंढरपूर अशा सततच्या दौऱ्यावर असणाऱ्या गाडगेबाबांची प्रकृती 1956 च्या नोव्हेंबर महिन्यापासून खालावली होती बरं वाटत नसल्यामुळे 7 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबा अमरावतीला परतले होते अमरावतीत डॉक्टर शहा यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते 13 डिसेंबर रोजी गाडगेबाबांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले बाबांना निमोनिया डायबेटिक नावाचा आजार जडला होता बाबांना जरा बरे वाटायला लागल्यामुळे त्यांनी चांदूरबाजार तालुक्यात असणाऱ्या नागरवाडी येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली संत गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 च्या रात्री साडेआठच्या सुमारास चांदूरबाजार या गावात आले चांदूरबाजार वरून नागरवाडी ला जायचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे त्यांना अनेकांनी सकाळी नागरवाडीला जाण्याचा आग्रह धरला रात्री अकरा वाजता संत गाडगेबाबांनी नागरवाडी जाण्याचा हट्ट धरला असताना डॉक्टरांनी मात्र त्यांना त्वरित अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला त्यावेळी गाडगेबाबांची गाडी अमरावतीच्या दिशेला वळविण्यात आली गाडगेबाबांची गाडी अमरावती पर्यंत पोहोचली असताना वलगाव च्या पिढी नदीवरील पुलावर गाडी असताना बाबांनी अखेरचा श्वास घेतला. गाडगेबाबांनी ज्या पुलावर अखेरचा श्वास घेतला त्या वेळी नदीच्या पुलाला आज संत गाडगेबाबा सेतू म्हणून ओळखले जाते.
तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत गाडगे बाबांवर अंत्यसंस्कार - संत गाडगेबाबांच्या निधनाची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर कळली होती. मी अमरावतीला आल्याशिवाय गाडगेबाबांवर अंत्यसंस्कार करू नये असा निरोप त्यावेळी तुकडोजी महाराजांनी अमरावतीत पाठवला होता. तुकडोजी महाराज दुसऱ्याच दिवशी अमरावतीला पोहोचले. राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत गाडगेबाबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गाडगेबाबांच्या पत्नी कुंताबाई देखील उपस्थित होत्या. संत गाडगे महाराजांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले आज या मंदिरालगतचा परिसर गाडगे नगर या नावाने ओळखला जातो.
गाडगेबाबांचे वाहन झाले संदेश रथ - संत गाडगेबाबा यांच्याकडे व्हीएम झेड 53 41 क्रमांकाची मोठी गाडी होती. या गाडीमध्येच त्यांचे निधन झाले होते. गाडगे बाबांचे हे वाहन आज देखील गाडगे नगर येथील समाधी मंदिर परिसरात जतन करून ठेवण्यात आले आहे. गाडगे बाबांचा संदेश विविध साहित्यांद्वारे समाजात पोहोचविण्यासाठी या वाहनाचा संदेश रथ म्हणून वापर करण्यात आला आता मात्र हे वाहन आहे त्या स्थितीतच मंदिर परिसरात जतन करून ठेवण्यात आले आहे. मात्र या वाहनाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून हे नवे वाहन संत गाडगेबाबांच्या विचारांचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी विचार रथ म्हणून अमरावती जिल्ह्यासहलगच्या परिसरात नियमित फिरतो. संत गाडगेबाबांचे कार्य त्यांचा संदेश विचार हे विविध साहित्याच्या माध्यमातून या संदेश रथाद्वारे विविध ठिकाणी प्रसारित केले जातात.
मंदिर परिसरात महारोग्यांची केली आंघोळ - संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी परवावर संत गाडगेबाबा मिशनचे अमरावतीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील महारोग यांची मंदिर परिसरात स्वतःच्या हाताने अंघोळ घातली. महारोग यांसह रस्त्यावर भटकणाऱ्या वृद्धांना मंदिराच्यावतीने जेवणही देण्यात आले.
संत गाडगेबाबांची यात्रा ही आहे प्रसिद्ध - दरवर्षी वीस डिसेंबरला संत गाडगेबाबांची पुण्यतिथी अमरावती शहरातील गाडगे नगर स्थित महाराजांच्या समाधी मंदिरात आयोजित करण्यात येते. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्य दहा डिसेंबर पासूनच समाधी मंदिरा समोरील मैदानावर भव्ययात्रा भरते. 27 डिसेंबरला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती पर्यंत संत गाडगे महाराजांची यात्रा राहते. संत गाडगे महाराजांची यात्रा प्रसिद्ध असून या यात्रेत गाडगे नगर परिसरातील प्रत्येक नागरिक सहभागी होतो तसेच अमरावती शहर आणि लगतच्या गावांमधून देखील अनेक जण गाडगे बाबांच्या यात्रेला येतात.