अमरावती Road Problem In Melghat : देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मात्र इथं मेळघाटात आमच्यासारख्या अनेक आदिवासी महिलांच्या समस्या अतिशय गंभीर आहेत. त्या सोडवल्या जात नाहीत, याकडं कोणाचं लक्ष नाही. शासनाच्या अनेक योजना येत आहेत. महिला सशक्तीकरणाच्या घोषणा दिल्या जातात. मात्र महिलांना जगाच्या संपर्कात येण्यास रस्ताच नाही, मग सांगा बरं विकास कसा साधेल, असा प्रश्न मेळघाटातील आदिवासी महिला उपस्थित करत आहेत. आमचा पती, मुलगा दगडं गोट्यावरुन वाहन चालवत चुकून दरीत कोसळला किंवा त्यांच्यासमोर वाघ आला तर आमचं काय होईल ? अशा असंख्य प्रश्नांना घेऊन मेळघाटातील अतिदुर्गम जारीदा इथल्या महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपल्या वेदनांना टाहो फोडला आहे.
"रतवाडा ते धारणी हा मध्य प्रदेशातील इंदोर बऱ्हाणपूर या प्रमुख शहरांना महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन नागपूर इंदोर गाडी नियमित धावते. या मुख्य मार्गावरुन दररोज 17 ते 18 फेऱ्या होतात. मेळघाटातील अतिशय दुर्गम भागापर्यंत सेवा देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. चुरणी लगतच्या भागात रस्ते अतिशय खराब आहेत, त्या भागात एसटी बस जाऊ शकत नाही. यासह अनेक दुर्गम भागातील रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. या भागात एसटी बस जाऊच शकत नाही. अतिशय छोट्या रस्त्यावर इतकी मोठी बस वळण घेऊ शकत नाही." - निलेश बेलसरे, अमरावती विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ
अशा आहेत समस्या : चिखलदरा तालुक्यात घनदाट जंगलात मध्यप्रदेशच्या सीमेलगत हातरू, रायपूर, रोहिट्याखेडा, चौराकुंड, गांगरखेडा, जारीदा, दाहिद्री, भुतृम, खोकमार, हातरू कोटमी अशी अनेक गावं आहेत. सात आठ वर्षांपूर्वी या सर्व गावांपर्यंत एसटी बस धावत होती. दिवसातून किमान दोन वेळा या गावातील रहिवाशांना एसटी बस दिसत होती. आता एसटी बस दिसेनासी झाल्यामुळं या भागातील आदिवासी बांधवांचा व्यापार, शिक्षण आणि आरोग्यासाठी जगाशी संपर्कच तुटला आहे. यापैकी अनेक गावांना जोडणारा रस्ताच खराब झाला आहे. यामुळं या भागात धावणारी एसटी बस बंद होण्याचं खरं कारण आहे.
36 किलोमीटरच्या अंतरासाठी शंभर किलोमीटर चा प्रवास : चिखलदरा तालुक्यात चिखलदऱ्यासह सेमाडोह हे बाजारपेठेचं केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणी बँक आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत मेळघाटातील सर्व दुर्गम भागातील रहिवाशांचं बँक खातं काढण्यात आलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट देखील अतिशय अॅक्टिव्ह आहेत. असं असताना बँकेचे व्यवहार तसेच बाजारपेठेला जोडणारे रस्तेच केवळ खराबच नव्हे, तर दगड धोंड्यात बेपत्ता झाले आहेत. यामुळंच 2017-18 मध्ये मध्य प्रदेशच्या सीमेवरील चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांना हातरू, जारीदा, भूत्रृम, खोकमार या मार्गे सीमाडोहला जोडणारा रस्ता खराब झाला. या मार्गावरून जारीदा ते सेमाडोह हे अंतर 36 किलोमीटर इतकं होतं. आता हा मार्ग खराब झाल्यानं या मार्गावरून एसटी बस धावत नाही. यामुळं सेमाडोहला जाण्यासाठी शंभर किलोमीटरचा फेरा पार करावा लागत आहे. याबाबत जाळीचा गावातील अनेक महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना रोष व्यक्त केला.
सतत होत आहेत आंदोलन : मेळघाटातील परतवाडा ते धारणी हा मुख्य रस्ता असून हा रस्ता गत अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी खराब आहे. आता सात आठ महिन्यापूर्वी धारणी ते हरिसाल हा अतिशय खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्यात आला. हरीसाल ते सेमाडोहपर्यंतचा रस्ता पुन्हा खराब आहे. सेमाडोहपासून घटांपर्यंत देखील दगड खड्ड्यांमधूनच वाहन उसळत जाते. आता या खराब मार्गाच्या दुरुस्तीचं काम काही ठिकाणी सुरू झालं असलं, तरी हा मुख्य मार्ग सोडला तर जंगलातील दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. आपल्या गावापर्यंत रस्ता व्हावा, गावात एसटी बस यावी, यासाठी अनेक ठिकाणी आदिवासी बांधव आंदोलन करत आहेत. आमच्या या आंदोलनाला दडपण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असून आता प्रशासनाकडून जे काही आश्वासन मिळालं आहे, त्यानुसार आम्ही एक जानेवारीपर्यंत धीर धरू, त्यानंतर मात्र तीव्र आंदोलन छेडणं हाच एकमेव पर्याय असल्याचं देखील जारीदा गावातील महिलांनी सांगितलं.
मेळघाटात आगारच नाही : अमरावती जिल्ह्यात येणारं मेळघाटचं जंगल धारणी आणि चिखलदरा अशा तालुक्यांमध्ये पसरलं आहे. नागपूर आणि अमरावती इथून मध्य प्रदेशातील इंदूर बऱ्हाणपूर या शहरांना जोडणारा मार्ग मेळघाटातून जातो. नागपूरवरून इंदूरसाठी या मार्गावरून नियमित बस आहे. या भागात एसटी बस जर बंद पडली, तर एसटी महामंडळाची कुठलीही सुविधा या भागात मिळत नाही. धारणी शहरापासून महाराष्ट्रात किंवा मध्य प्रदेशात कुठलंही बस आगार हे शंभर किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर नाहीत. या भागात मोबाईल फोनची रेंज नसल्यामुळं अडचणीत असलेले बस चालक आणि वाहकाचा कोणाशी संपर्क होऊ शकत नाही. या कारणामुळं देखील या भागात हव्या तशा बस फेऱ्या नाहीत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मेघाटातील 70 ते 80 टक्के दुर्गम गावांपर्यंत एसटी बस पोहोचायची. आता मात्र केवळ दहा ते पंधरा टक्के गावांनाच एसटी बस दिसत आहे.
आदिवासी बांधव आंदोलनाच्या तयारीत : आपल्या गावात पूर्वीसारखी एसटी बस यावी, आपल्या गावापर्यंतचा रस्ता चांगला व्हावा, या मागणीसाठी गत काही महिन्यांपासून जंगलात अति दुर्गम भागात असणाऱ्या अनेक गावातील आदिवासी बांधवांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सेमाडोह हरीसाल मार्गावर सातत्यानं होत असलेल्या आंदोलनामुळं हा मार्ग दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. दुर्गम गावात मात्र परिस्थिती अद्यापही गंभीर असून तीव्र आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आता आदिवासी बांधव बोलायला लागले आहेत.
मेळघाटात एसटी बसच्या 72 फेऱ्या : "परतवाडा ते धारणी हा मध्य प्रदेशातील इंदोर बऱ्हाणपूर या प्रमुख शहरांना महाराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन नागपूर इंदोर गाडी नियमित धावते. या मुख्य मार्गावरुन नियमित 17 ते 18 फेऱ्या होतात. मेळघाटातील अतिशय दुर्गम भागापर्यंत सेवा देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. अशा दुर्गम भागात प्रवासी मिळत नसले तरी आदिवासी बांधवांच्या सुविधेसाठी आमच्या गाड्या धावत आहेत. मानव विकास अंतर्गत सात गाड्या मेळघाटातील दुर्गम भागात नियमित जातात. चुरणी लगतच्या भागात रस्ते अतिशय खराब आहेत, त्या भागात एसटी बस जाऊ शकत नाही. यासह अनेक दुर्गम भागातील रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. या भागात एसटी बस जाऊच शकत नाही. अतिशय छोट्या रस्त्यावर इतकी मोठी बस वळण घेऊ शकत नाही. ज्या भागात रस्तेच नाहीत, त्या भागात बस धावत नसली, तरी ज्या भागात रस्ते आहेत, त्या भागात असणाऱ्या गावांपर्यंत बसची एक फेरी तरी आम्ही नियमित पूर्ण करतो" असं एसटी महामंडळाचे अमरावती विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना स्पष्ट केलं.
हेही वाचा :