अमरावती - लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून मेळघाटातील पर्यटन स्थळे बंद होती. मात्र, आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे पर्यंटकांसाठी आजपासून(शुक्रवार) खुली करण्यात येणार आहेत. यात फक्त जंगल सफारी आणि इतर सुविधाच सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य, काटेपुर्णा वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य निसर्ग पर्यटन केंद्र तसेच चिखलदरा जवळचे सीमाडोह, हरीसाल आदी पर्यटन स्थळे अटी शर्तीसह सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेळघाटात पर्यटनासाठी येणारे हजारो पर्यटक हे दोन दिवसांसाठी येत असतात. परंतु कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी आता पर्यटकांना याठिकाणी थांबण्याच्या सुविधेची मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही.
मागील तीन महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बंद असल्याने स्थनिक व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून पर्यटकांसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याची मागणी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर वनमंत्री यांनी 1 जुलैपासून राज्यातील सर्वच प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अखेर सुरू होणार असल्याचे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहे.
अटीशर्तींचे पालन करा-
पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वच पर्यटकांना विविध अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. पर्यटक गेटवर दाखल होताच त्यांना मागील केलेल्या यात्रेची नोंद करावी लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचे थर्मल स्क्रीनिग, त्याची आरोग्य तपासणी, केली जाणार आहे. सोबत निश्चित करून दिलेल्या कालावधीत पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात फिरता येणार आहे.