अमरावती- पोलिसांद्वारे संशयित वाहनाची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राणघातक हत्यारे सापडली आहेत. शुक्रवारी रात्री लालखाडी, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात दोन गटात हाणामारी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात गस्त वाढवली होती. गस्ती दरम्यान पोलिसांना एका वाहनात ही हत्यारे सापडली. या घटनेमुळे लालखाडी पठाण चौक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्या वैमन्यास्यातून दोन गटात रात्री राडा होणार असल्याची माहिती मिळताच गडगेनगर, खोलपुरी गेट आणि नागपुरी गेट पोलीस सतर्क झाले होते. एका नेव्ही ब्ल्यू रंगाच्या टाटा सफारी गाडीत चार ते पाच जण शास्त्र घेऊन निघाले असून, या कारसोबत ८ ते १० जण दुचाकीने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांना गस्तीदरम्यान संबंधित गाडी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आढळली. पोलीस त्या गाडीच्या दिशेने निघताच गाडीतील दोघा चौघांसह दुचाकीस्वार तेथून पळून गेलेत. यावेळी मोहम्मद सादिक शेख रज्जाक (३६), नवजीश अली बेग(38), वसीम खान माल खान, (32) आणि आबीद खान सुभान खान(25) यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी वाहनातून १४ तलवारी, दोन देशी पिस्टल आणि एकूण पाच जिवंत काडतुससह ४ मोबाईल फोन आणि ९ दुचाकी असा एकूण १५ लाख ६१ हजार रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशावरून गडगेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, डी.बी स्कॉडचे शेखर गेडाम, अनील तायवाडे, सतीश देशमुख, भारत वानखडे, रणजित गावंडे, रवी देवीकर, जाहीर शेख यांनी ही कारवाई केली आहे.