अमरावती - जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे 22 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू आहेत. त्यांनाही फक्त घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आळा बसावा म्हणून पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय लोकांना आणि रुग्ण सेवेतील लोकांनाच पेट्रोल दिले जात आहे. तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोल न दिल्यास लोकांनी गोंधळ करू नये, यासाठी मागील काही दिवसांपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर होमगार्डची नेमणूक अमरावती शहर पोलिसांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे ट्रॅक्टर, मालवाहू ट्रक शासकीय वाहन, रुग्णसेवा अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पेट्रोल दिले जात नाही. जे लोक विनाकारण फिरतात, अशा लोकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाऊ नये यासाठी होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
ओळखपत्र दाखवले तरच पेट्रोल
लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणावर लोक पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करताना दिसत आहेत. परंतु, जे लोक अत्यावश्यक सेवा, रुग्ण सेवेतील आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रे, ओळखपत्रे पाहून त्यांना पेट्रोल दिले जात आहे. अन्यथा लोकांना पेट्रोल दिले जात नाही.
शेतकऱ्यांना पेट्रोल देण्याची मागणी
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतात मशागतीची कामे सुरू आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार शेतात जावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत दूर आहे, त्या शेतकऱ्यांना दुचाकीशिवाय पर्याय नाही. परंतु त्या शेतकऱ्यांना पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पेट्रोल द्यावे, अशी मागणीही जनसामान्यातून होत आहे.
हेही वाचा - आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट