अमरावती - मेळघाट धारणी परिसर हा दुर्गम भाग समजला जातो. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही आज येथील आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने जीवन जगत आहेत. महत्वाचं म्हणजे आदिवासी लोकांमध्ये आजही अंधश्रद्धा पाहायला मिळते. आदिवासी बांधव आजही भोंदूबाबाकडे उपचार घेत असल्याचे चित्र आहे. मेळघाटात कुपोषणाची फार मोठी समस्या आहे. बालमृत्यू, गर्भवती मृत्यू आणि डंबा देण्याचा प्रकार आजही सुरू आहे. अशा दुर्गम भागात मात्र आरोग्य विभागाचे धारणी येथे सुसज्ज असे 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालय आहे. उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. गेल्या १५ महिन्यात या ठिकाणी १५०० प्रसुती यशस्वी पार पडल्या आहेत.
धारणीत सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय
ज्या मेळघाटात अंधश्रद्धा आहे, त्याच भागात आरोग्य व्यवस्था देखील उत्तम आहे; हे वास्तव आहे. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कुपोषित असलेल्या बालकांवरील उपचारासाठी या ठिकाणी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मदतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेखा गजरालवार यांनी खासगी रुग्णालयाला लाजवेल अशा सोयी रुग्णालयात केल्या आहेत.
![धारणी उपजिल्हा रुग्णालय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_02072021135201_0207f_1625214121_1043.jpg)
कोरोनाग्रस्त महिलांची यशस्वी प्रसूती
धारणी ते अमरावती असे एकूण १५० कि.मी. अंतर पार करून रुग्णाला उपचार घावा लागायचा. आता ही प्रथा त्यांनी मोडीत काढली आहे. कोरोना काळात या रुग्णालयात त्यांनी कोरोना बाधित महिलांच्या यशस्वी प्रसूती केल्या आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या चमुचा मोठा हातभार मिळाला.
सर्व आजारांवर होणार उपचार, भोंदूबाबा संपुष्टात येणार
गेल्या १५ महिन्यात या रुग्णालयात तब्बल १५०० प्रसूती करण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील कर्मचारी आरोग्य उपचार देण्यासोबतच आदिवासी बांधवांच्या मनात वसलेला अंधश्रद्धेचा रोगही बरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मेळघाटमधील नागरिकांना शहरातच सुसज्ज आरोग्य व्यवस्था मिळणार आहे. आरोग्य व्यवस्थेच्या सर्व सोयीने उपजिल्हा रुग्णालय झाल्याने आणखी मोठ्यात मोठ्या आराजांवर या ठिकाणी उपचार करता यावा, असा मानस येथील वैद्यकीय अधीक्षकांचा आहे. त्या दिशेने उपजिल्हा रुग्णालयाची वाटचाल देखील सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण मेळघाट परिसरात अशीच आरोग्य व्यवस्था उभी राहिली आणि अंधश्रद्धेवर जनजागृती झाली; तर भोंदूबाबाचा काळ संपुष्टात येऊन आदिवासींचा आरोग्य व्यवस्थेवर विश्वास वाढेल, यात दुमत नाही.
गेल्या 15 महिन्यात 1500 महिलांची यशस्वी प्रसूती
गेल्या १५ महिन्यात या रुग्णालयात तब्बल १५०० प्रसूती करण्यात आल्या आहेत. गर्भवती मातेची प्रसूती करताना आधी पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे प्रसूती करताना खूप अडचणी निर्माण होत होत्या. सध्या वेळेवर सोनोग्राफी, पुरेसा रक्त पुरवठा, यासारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कितीही गंभीर परिस्थितीतील प्रसूती करणे सोईस्कर झाले आहे. त्यामुळे हा 1500 प्रसूतीचा उच्चांक गाठण्यात आला आहे.
उपचाराशी गाठ, भोंदूबाबाकडे पाठ
वरिष्ठांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांचा आरोग्य सेवेवरील विश्वास वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक आदिवासी रुग्णांनी उपचारासाठी भोंदूबाबाकडे न जाता उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतल्याचे दिसत आहे.
![धारणी उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी 22 बेडचा अतिदक्षता विभाग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_02072021135201_0207f_1625214121_139.jpg)
बालकांसाठी 22 बेडचा अतिदक्षता विभाग
जिल्ह्यातील एकमेव असे हे उपजिल्हा रुग्णालय आहे, जिथे लहान बालकांसाठी तब्बल 22 बेडचा सुसज्ज असा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. या अतिदक्षता सेंटरमध्ये कुपोषित बालक, कमी वजनाचे बालक यांना ठेवले जाते. अलीकडच्या काळात एका बालकाला तब्बल दीड महिना ठेवून त्याचे यशस्वीरीत्या वजन वाढवण्यात आले. यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
हेही वाचा - ७०० कोटींचा घोटाळा, ईडीचा अजित पवारांना दणका, साताऱ्यातील साखर कारखाना जप्त