अमरावती - राज्यात सरकार स्थापन न होऊ शकल्याने राष्ट्रपती राजवट आजपासून लागू झाली आहे. यातच आमदार रवी राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांना भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
अपक्ष आमदार रवी राणा आघाडीचा पाठिंबा घेऊन निवडून आले. त्यानंतर निवडून येताच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता राज्यातील सत्ता समीकरणे बदलत असल्याचे पाहून रवी राणा यांनी राष्ट्रपती राजवटीला शिवसेनाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे, अशी विनवनी राणा यांनी केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राणा म्हणाले...
आज राष्ट्रपती राजवट लागली ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब आहे. निवडणूकांमध्ये पूर्ण बहूमत हे जनतेने भाजप-सेनेला दिले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार शिवसेनेला संपर्क केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. जर राज्यात भाजप-सेनेचे स्थिर सरकार आले असते. तर महाराष्ट्रचे अनेक प्रश्न सुटले असते. शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. महाराष्ट्रामधील जनताच शिवसेनेला धडा शिकवेल. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, या अपेक्षेने आम्ही 20 दिवसांपासून मुंबईत ठिय्या मांडून बसलो आहोत. मी शरद पवार यांना विनंती करतो की, त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असे रवी राणा यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.