अमरावती - प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनाचा आढळला नाही. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोनाचे संशयास्पद असल्याचे बोलले जात होते. बच्चू कडू यांना ताप व खोकला असल्याने त्यांनी 26 मार्चला आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. तसेच संशयित असल्याने त्यांनी अमरावतीत आपल्या निवासस्थानी स्वतःला होम क्वारंटाईन करून ठेवले होते.
आज बच्चू कडू यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. बच्चू कडू हे संशयास्पद असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे यादरम्यान मदत आणि इतर कामांसाठी सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. तसेच आपल्या मतदारसंघात कोरोनाची तपासणी करते वेळी उपस्थित होते. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, तरीही त्यांनी स्वतःला 10 दिवसासाठी ‘होम क्वारंटाईन’ करून घेतले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, चिंता करू नये तसेच स्वतःची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.