अमरावती : ऋत्विकचे वडील निलेश डोंगरे हे राज्य परिवहन महामंडळात मेकॅनिक आहे तर आई गृहिणी आहे. त्याचे मामा अमोल हरणे हे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात राहतात. मामाने आजोळी आलेल्या ऋत्विकचे पाठांतराचे गुण हेरले. त्याला शिवाजी महाराजांचा पोवाडा कसा म्हणायचा कसा पाठ करायचा हे सांगितले. ऋत्विकने प्रतापगड शौर्याचा पोवाडा दोन दिवसात पाठ केला त्याला थोडी अभिनयाची जोड देत त्याच्या मामाने त्याचा व्हिडिओ काढला. त्याच्या या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक झाले त्यानंतर फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट,युट्यूबवर त्याला लाखो व्ह्युज मिळाले. ऋत्विकमध्ये असणारे कलागुण हेरुन त्याचे मामा अमोल हरणे यांनी त्याचे नाव कौतुकच ठेवले.
आई-वडिलांकडून प्रोत्साहन : आता शाळेत आणि कागदोपत्री ऋत्विक नाव असले तरी तो कौतुक म्हणूनच घरी आणि परिसरात ओळखला जातो. आई जया डोंगरे ही ऋत्विकचे घरीच विविध अभिनयातील व्हिडिओ मोबाईलवर शूट करते. कौतुकने बाल वयात बोबड्या बोलात पसायदान पाठ केले. यासह महात्मा गांधी सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी विविध थोर पुरुषांच्या भूमिका साकारून व्हिडिओ तयार केलेत. आता नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ऋत्विकने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्याच्या हा कलागुणांना त्याचे आई-वडील प्रोत्साहन देत आहेत. सोबतच आजोबा दादाराव डोंगरे, आजी शोभा डोंगरे हे देखील आपल्या नातवामध्ये विविध कला गुण अधिक बहरावे यासाठी त्याला मार्गदर्शन करतात.
खेळता खेळता पोवाडा केला पाठ : माझी आई मला अभ्यास करायला सांगते तशी मला खेळायला देखील सूट देते. मी ज्यावेळी घरात खेळत असतो त्यावेळी आई पोवाडे लावते लाऊड स्पीकरमुळे मीच खेळत असताना देखील हे पोवाडे ऐकत असतो. हिरकणीचा पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच तानाजींचा पोवाडा मी खेळता खेळताच पाठ केला, असे ऋत्विक उर्फ कौतुक 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाला. ऋत्विकने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटल्यावर तो माझ्या भावाने युट्युब वर टाकला असताना या पोवाड्यासाठी काही डॉलर मिळाल्याचे आई जया डोंगरे यांनी सांगितले.
शिवगर्जनेने होते दिवसाची सुरुवात : ऋत्विकच्या दिवसाची सुरुवात ही शिवगर्जना म्हणून होते. त्याची शिवभक्ती आणि शिवस्तुती बघून त्याला आमला विश्वेश्वर या गावासह चांदूर रेल्वे शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले जाते. ऋत्विक सहा वर्षांचा असताना आई-वडिलांसह त्यांनी थेट रायगडला जाऊन शिवगर्जना व पोवाडा गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली होती.
हेही वाचा : March in Pusad : लव जिहाद धर्मांतरण, गोहत्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुसदमध्ये मोर्चा