अमरावती - कोरोनाबाधितांच्या संपर्कात असणाऱ्या एका तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्याचा खळबळजनक प्रकार अमरावतीत समोर आला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अल्पेश अशोक देशमुख (वय-30, रा. पुसदा ), असे या आरोपीचे नाव आहे. हा व्यक्ती बडनेरा येथील ट्रॉमा केअर कोरोना चाचणी प्रयोग शाळेत टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे.
या प्रकरणातील 24 वर्षीय पीडित तरुणी ही अमरावती शहरात भावासोबत राहते. ती एका मॉलमध्ये नोकरी करत असून या मॉलमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांची बडनेरा येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. मात्र, तरीही प्रयोगशाळेतील टेक्निशियन अल्पेशने तरुणीला बोलवून तुझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून लघवीची तपासणी करावी लागेल, असे संगितले. आमच्याकडे या तपासणीसाठी महिला कर्मचारी नाही. तू कोणत्याही महिलेला सोबत आणले तरी हरकत नाही, असे अल्पेशने त्या तरुणीला सांगितले. ही तरुणी तपासणीसाठी आली असता अल्पेशने तिला एका खोलीत नेऊन तिच्या गुप्तांगाची तपासणी केली आणि अवघ्या 5 मिनिटात अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले.
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत तरुणीला शंका वाटल्याने तिने घडलेला सर्व प्रकार भावाला सांगितला. यानंतर अल्पेशने तरुणीच्या मोबाईलवर संदेशही पाठवला. या गंभीर प्रकाराबाबत तरुणीने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बडनेरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील हा प्रकार वाईट आणि अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्या मुलीने तक्रार केली नसती तर इतके मोठे प्रकरण समोर आले नसते. त्यामुळे मुलींनी आणि महिलांनी सजग राहावे आणि असे काही प्रकार होत असल्यास लगेच समोर येऊन सांगावे, असे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले.