अमरावती - माता रुक्मिणीचे माहेरघर आणि विदर्भाचे पंढरपूर असलेल्या कौंडण्यपूर येथे शेकडो वर्षांपासून कार्तिकी एकादशीचा सोहळा होतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीला कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीचे मंदिर बंद राहणार आहे. तसेच ३० आणि १ तारखेला होणारा दिंड्यांचा रिंगण सोहळा आणि दहीहंडीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने परिपत्रक काढले असून भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्तिक एकादशीवरही कोरोनाचे सावट
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. त्यासाठी विदर्भातून मोठ्या प्रमाणावर लाखो विठ्ठलभक्त हे कौंडण्यपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नाही तर ३० आणि १ तारखेला होणारा दहीहंडी व गोपाळकाल्याचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी कोणीही न येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.