अमरावती - जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)तासिका निदेशकांची लॉकडाऊन काळात हेळसांड होत आहे. त्यांच्या मानधनासाठी निधी दिला जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या शिक्षकांवर पडेल ते काम करण्याची वेळ आली आहे. अशात एका आयटीआयच्या शिक्षकावर सोयबीन सोंगण्याची(काढणी) वेळ आली आहे. शरद बेहरे असे या शिक्षकाचे नाव आहे.
कोरोनामुळे अनेक क्षेत्रातील लोकांच्या हातचे काम गेले. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. विद्यार्थ्यांच्या हातांना कामासाठी सक्षम करणाऱया आयटीआयमधील निदेशकांवर वाईट परिस्थिती आली आहे. अमरावती जिल्ह्यातील आयटीआयमधील शेकडो तासिका निदेशकांना मार्च महिन्यापासून अजिबात वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. मानधनासाठी संबंधित कार्यालयाकडून केवळ पत्रांचा फार्स सुरू असून मानधन देण्याची प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही, असे बेहरे यांनी सांगितले.
दरम्यान, शरद बेहरे यांच्यासारखीच परिस्थिती राज्यातील अनेक कंत्राटी, खासगी व तासिका त्तत्वावर शिकवणाऱया शिक्षकांवर आली आहे. कुणी भाजीपाला विकण्याचे काम करत आहेत तर कुणी खाद्यपदार्थ विक्रीचे काम करत आहे. राज्य शासनाने आमच्या अडचणी लक्षात घेऊन मदत करावी, अशी मागणी हे शिक्षक करत आहेत.